मादाम तुसादच्या चार संग्रहालयात जागा मिळवणारी प्रियंका पहिली ग्लोबल सेलिब्रिटी

priyanaka-chopra
बॉलिवूड देसी गर्ल म्हणून ओळख असलेली प्रियंका चोप्रा आता ग्लोबल स्टार बनली आहे. आता तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आपल्या या देसी गर्लला वाढत्या लोकप्रियतेमुळे मादाम तुसाद संग्रहालयात पोहचवले आहे.

प्रियंकाचा मेणाचा पुतळा अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित मादाम तुसाद संग्रहालयात उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर लवकरच लंडन, सिडनी आणि आशियातही तिचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचमुळे प्रियंका आता मादाम तुसादच्या चारही संग्रहालयात जागा मिळवणारी पहिली ग्लोबल सेलिब्रिटी बनली आहे. अमेरिकन गायिका व अभिनेत्री व्हिटनी ह्युस्टन आत्तापर्यंत केवळ एक अशी सेलिब्रिटी होती, जिचे मादाम तुसादच्या तीन संग्रहालयात मेणाचे पुतळे होते.

न्यूयॉर्कस्थित मादात तुसाद संग्रहालयाला प्रियंकाने भेट दिली. तिने आपल्या सोशल अकाऊंटवर या मेणाच्या पुतळ्यासोबतचे अनेक फोटो व व्हिडिओ पोस्ट केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका कायम चर्चेत आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न केले. तिच्या या लग्नाचीही जगभर चर्चा झाली. गेल्या काही वर्षांत प्रियंकाने हॉलिवूडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे.

Leave a Comment