
विद्यापीठाचे कॅम्पस हे धर्मनिरपेक्ष असल्याचे कारण देऊन केरळमधील एका विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सरस्वती पूजा करण्यास मज्जाव केला होता. यामुळे वाद निर्माण झाल्यामुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले. अलप्पुळा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
विद्यापीठात सरस्वती पूजेला नकार, वादानंतर प्रशासन झुकले
कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (सीयूएएसएटी) असे या विद्यापीठाचे नाव आहे. गेल्या वर्षीपर्यंत या विद्यापीठात वार्षिक उत्सवात ही पूजा होत असे. हे विद्यापीठ सरकारी मालकीचे मात्र स्वायत्त आहे.
विद्यापीठाच्या कुट्टनाड कॅम्पसमधील काही उत्तर भारतीय विद्यार्थ्यांनी 9 आणि 11 जानेवारीदरम्यान ही पूजा करण्याची परवानगी मागितली होती. मात्र सीयूएएसएटीच्या कुलगुरूंनी त्यांची विनंती नाकारली. हे विद्यापीठ धर्मनिरपेक्ष असल्यामुळे कॅम्पसवर धार्मिक कृतींना परवानगी देऊ शकत नाही, असे कारण देत त्यांनी ही परवानगी देण्यास नकार दिला. ही परवानगी नाकारणारे पत्र 1 फेब्रुवारी रोजी लिहिले होते.
या नोटिसीनंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट करण्यात आल्या.नोटिस मागे घेण्यात आली नाही तर महाविद्यालयाबाहेर आंदोलन सुरू करण्याची धमकी काही संघटनांनी दिली होती.
मात्र यावर वाद निर्माण झाल्यामुळे गुरुवारी विद्यापीठाने अखेर ही परवानगी दिली. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या दोन गटांत संघर्ष झाल्यानंतर सर्व धार्मिक उपक्रम आणि सणांना कॅम्पसमध्ये बंदी घालण्यात आली होती, असे विद्यापीठाच्या रजिस्ट्रारनी हिंदुस्तान टाईम्स वृत्तपत्राला सांगितले.
गेल्या वर्षी महाविद्यालयीन उत्सवादरम्यान एका गटाने गोमांस वाटले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. महाविद्यालयीन शिकवण्या अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून धार्मिक उत्सवांना कॅम्पसमध्ये मनाई करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
