थायलंडमध्ये राजकुमारीच बनल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार

princess
थायलंडमध्ये येत्या मार्च महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार असून एका थाई राजकीय पक्षाने पंतप्रधानपदासाठी राजाच्या बहिणीलाच उमेदवारी दिली आहे. देशाच्या राजकारणातील हे एक अभूतपूर्व पाऊल असून यामुळे राजेशाहीला राजकारणात सक्रिय भूमिका मिळणार आहे.

राजा वजिरलोंगकोर्न यांची 67 वर्षीय बहीण राजकुमारी उबोलरत्ना राजकन्या या थाई रक्षा चार्ट पार्टी या पक्षाकडून उमेदवार असणार आहेत. माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांच्याशी हा पक्ष संबंधित असून शिनावात्रा याना सैन्याने 2005मध्ये बंडखोरी करून सत्तेतून बेदखल केले होते.

सैन्याचा पाठिंबा असलेले सध्याचे पंतप्रधान प्रयूत चान-ओ-चा हे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असतील. प्रयूत यांनीही शुक्रवारी आपली उमेदवारी जाहीर केली.

थाई रक्षका चार्ट पार्टीचे अध्यक्ष लेफ्टनंट प्रीचपोन पोंगपानिच यांनी शुक्रवारी एका निवेदनात उबोलरत्ना यांच्या उमेदवारीची पुष्टी केली. “आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आम्ही राजकुमारी उबोलरत्ना यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. बैठक संपल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी उदारपणे आमची विनंती मान्य केली,” असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

थायलंडमधील निरंकुश राजेशाही 86 वर्षापूर्वी पूर्ण संपुष्टात आली होती. त्यानंतर शाही कुटुंबातील कोणा व्यक्तीने राजकारणात उमेदवारी करण्याची घटना घडलेली नाही.

Leave a Comment