६ महिन्यानंतर वेस्ट इंडिज संघात ख्रिस गेलची वापसी

chris-gyale
मुंबई – वेस्ट इंडिजच्या संघात जगातील सर्वाधिक विस्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या ख्रिस गेलचे पुनरागमन झाले आहे. वेस्ट इंडिजच्या संघाची इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या २ एकदिवसीय सामन्यांसाठी घोषणा झाली आहे. ख्रिस गेलचा यात समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत राष्ट्रीय संघात डाव्या हाताने फलंदाजी करणारा निकोलस पूरन याचीही निवड झाली. २० फेब्रुवारीला दोन्ही संघात पहिला एकदिवसीय सामना होणार आहे.

मागील वर्षीच्या जुलैपासून आक्रमक फलंदाज ख्रिस गेल संघातून बाहेर आहे. अखेर त्याचे ६ महिन्यानंतर संघात पुनरागमन झाले आहे. ३९ वर्षीय गेलची संघात निवड इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक डोळ्यासमोर करण्यात आली आहे. गेल वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणार दूसरा खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने २८४ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने ९ हजार ७२७ धावा केल्या.

गेल शिवाय २३ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन याला संधी देण्यात आली. यापूर्वी तो वेस्ट इंडिजच्या टी-२० संघातही खेळला आहे. ८ टी-२० सामन्यांमध्ये त्याने १४८ धावा केल्या आहेत. त्यात नाबाद ५३ ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे. वेस्ट इंडिजने इंग्लंडला पहिल्या २ कसोटी सामन्यात पराभूत केले आहे. आता ख्रिस गेलच्या पुनरागमनाने वेस्ट इंडिजचा संघ अधिक मजबूत दिसत आहे.

वेस्ट इंडिजचा एकदिवसीय संघ – फॅबियन एलेन, देवेंद्र बिशू, डेरेन ब्रावो, ख्रिस गेल, शिमरान हेटमायर, जेसन होल्डर(कर्णधार), शाई होप, इवान लुइस, एशले नर्स, कीमो पॉल, निकोलस पूरन, रॉवमॅन पॉवेल, कीमार रोच, ओशेन थॉमस

Leave a Comment