लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार – कमल हासन

kamal

अभिनेता आणि राजकारणी कमल हासन यांचा मक्कळ नीदी मण्ड्रम (एमएनएम) हा पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूतील सर्वच 39 जागांवर स्वबळावर निवडणूक लढणार आहे. स्वतः कमल हासन यांनी गुरुवारी ही घोषणा कोईम्बतूर येथे केली.

आतापर्यंत एमएनएम हा अन्य पक्षांसोबत युती करण्याच्या प्रयत्नात होता. खासकरून काँग्रेस आणि द्रमुकशी युती करण्याची एमएनएमची योजना होती.

“आम्ही स्वच्छ हाताने लोकांचे भले करण्याचा प्रयत्न करीत आहोत. कोणत्याही द्रविडी पक्षांशी युती न करता आम्ही आपले हात स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत,” असे 64 वर्षीय हासन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आपला तमिळनाडूतील सर्व 39 लोकसभा जागा आणि शेजारच्या पुदुच्चेरीतील एक जागा लढवणार आहे का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “होय, आम्ही असा निर्णय घेतला आहे.”

आमचा पक्ष समविचारी पक्षांसोबत मिळून लोकसभा निवडणूक लढवेल, असे हासन यांनी यापूर्वी जाहीर केले होते.
कमल हासन यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मोठा गाजावाजा करून आपला राजकीय पक्ष सुरू केला होता.

Leave a Comment