निवडणुकीसाठी निधी गोळा करण्यासाठी भाजपचा नवा फंडा

donation
मुंबई: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी निधी गोळा करण्यासाठी नवा फंडा आजमावला आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावेच निधी गोळा करण्यास भाजपने सुरुवात केली आहे. धनदांडग्यांकडेच नव्हे तर देशभरातील जनतेकडून हा निधी गोळा करण्यात येणार आहे. देशातील जनतेला भाजपने तसे आवाहन केले आहे. छोटी गुंतवणूक करुन उज्ज्वल भारत बनवण्याची संधी तुमच्याकडे असल्याचे मेसेज भाजपकडून देशभरातील जनतेला पाठवण्यात येत आहेत. 5 रुपयांपासून पुढे कितीही रुपयांची मदत करता येणार आहे. त्यासाठी स्क्रॅच कुपनसारखी पद्धत अवलंबली आहे.

या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी योगदान द्या असाही संदेश देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेबसाईट narendramodi.in याद्वारे हा फंड जमा केला जात आहे. तुम्हाला निधी देण्यासाठी मेसेज पाठवला जातो. पंतप्रधानांच्या वेबसाईटची लिंक त्यामध्ये दिली जाते. या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करावे लागते. मग डिटेल्स भरुन पैसे पाठवल्यानंतर तुम्हाला पैसे जमा झाल्याची पावती मेल केली जाते. राजकीय पक्षाला दिलेला निधी हा टॅक्स फ्री आहे.

भाजपने निवडणुकांच्या तोंडावर निधी जमवण्यासाठी ही शक्कल लढवली आहे. पंतप्रधान मोदींच्या नावेच पाच रुपयांपासून कितीही रुपयांपर्यंत मोदी मागितली जात आहे. पंतप्रधानांच्या नावेच, ते ही मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पैसे द्या, अशी मागणी भाजपकडून केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Leave a Comment