जाणून घेऊ या हिंदू धर्मीय अमेरिकन सांसद तुलसी गॅबार्ड यांच्याविषयी काही

gabbard
२०२० साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये हिंदू धर्मीय अमेरिकन सांसद तुलसी गॅबार्ड संभाव्य उमेदवार ठरण्याची चिन्हे आहेत. २०२० साली होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी तुलसी निवडणूक लढविणार असल्याची शक्यता असल्याचे तुलसी यांच्या एका निकटवर्ती सहकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. या शक्यतेचे उत्स्फूर्त स्वागत अमेरिकन जनतेने केले असले, तरी तुलसी यांनी स्वतःहून या संदर्भात कोणतेही वक्तव्य अद्याप केलेले नाही. येत्या वर्षाखेर पर्यंत या बाबतीत अधिकृत घोषणा केली जाणे अपेक्षित आहे. सध्याच्या काळामध्ये तुलसी आणि त्यांचे सहकारी मतदारांशी सातत्याने भेटीगाठी करीत असून, अमेरीकेमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यावर अधिक भर दिला जात आहे.
gabbard1
अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी स्थायिक होऊन तेथील नागरिकत्व स्वीकारलेल्या भारतीयांमध्ये तुलसी यांची लोकप्रियता अधिक आहे. अमेरिकन ज्यू लोकांच्या प्रमाणेच अमेरिकेमध्ये स्थायिक असलेला, मूळचा भारतीय असणारा समुदाय अत्यंत प्रभावशाली आणि धनाढ्य समजला जातो. म्हणूनच हिंदू धर्मीय तुलसी गॅबार्ड हवाई राज्यातील ‘स्टेट लेजिस्लेचर’मध्ये सातत्याने निवडून येत राहिल्या आहेत. तुलसी गॅबार्ड या सध्या सलग चौथ्या वेळी अमेरिकन सांसद म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच त्या ‘आर्म्ड सर्व्हिस कमिटी’ आणि ‘एक्स्टर्नल अफेअर्स कमिटी’च्या सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.

तुलसी गॅबार्ड या मूळच्या भारतीय नाहीत. त्यांचा जन्म एका कॅथलिक परिवारामध्ये, लेलोआलोआ, अमेरिकन सामोआ येथे १९८१ साली झाला. तुलसी यांना आणखी चार भावंडे असून, त्यांचे वडील माईक गॅबार्ड मूळचे समोअन-युरोपीय आहेत, तर तुलसी यांच्या आई कॅरोल या ही मूळच्या युरोपियन आहेत. माईक हे कॅथलिक चर्चचे सक्रीय सभासद असून कॅरोल यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. तुलसी यांनी देखील आपल्या आईप्रमाणे हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. तुलसी यांनी हवाई पॅसिफिक विद्यापीठातून पदवी घेतली असून, बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यांनी बी.एससीची पदवी घेतली आहे.

पुढल्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जेव्हा तुलसी यांचे नाव समोर येऊ लागले, तेव्हापासून तुलसी यांना अमेरिकन भारतीयांकडून चांगले समर्थन मिळत आहे. जर राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय तुलसी यांनी घेतला, तर एका मोठ्या राजनैतिक दलाकडून ( डेमोक्रॅटिक पार्टी ) निवडणूक लढविणाऱ्या त्या पहिल्याच हिंदू धर्मीय सदस्य ठरणार आहेत. तसेच या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यास त्या अमेरिकेच्या प्रथम महिला राष्ट्रपती आणि त्याचबरोबर सर्वात युवा राष्ट्रपती देखील ठरतील. तुलसी त्यांच्या सक्रीय राजनैतिक कारकीर्दीमुळे सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. सांसद म्हणून निवडून आल्यानंतर शपथविधी होत असताना भग्वद् गीतेवर हात ठेऊन शपथ घेणाऱ्या अशा या सांसद आहेत.

राजकारणामध्ये येण्यापूर्वी तुलसी हवाई आर्मी नॅशनल गार्डच्या मेडिकल युनिटमध्ये कार्यरत असून, इराक आणि कुवेत सारख्या युद्धाच्या ठिकाणी त्यांना पाठविण्यात आले होते. सैन्यामध्ये असतानाही तुलसी यांनी उत्तम कामगिरी करीत अनेक सन्मान मिळविले आहेत. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी हवाई येथील स्टेट लेजिस्लेचर मध्ये निवडून आलेल्या तुलसी वयाने सर्वात असणाऱ्या उमेदवार होत्या. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक त्या लढविणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment