हिंदू महासभेच्या ‘त्या’ महिला राष्ट्रीय सरचिटणीसला अटक

pooja-pandey
अलिगढ – अलिगढ पोलिसांनी तप्पाल येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गोळी मारुन त्यांची पुण्यतिथी साजरी करणाऱ्या हिंदू महासभेची राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे या दोघांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार गांधीजींच्या पुण्यतिथीदिनी ३० जानेवारी २०१९ रोजी घडला होता. नथुराम गोडसेने याच दिवशी १९४८ रोजी महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती.

एवढ्या विकृतपणे हा सगळा प्रकार करण्यात आला होता की, गांधींच्या पुतळयामधून पूजा पांडेने गोळी मारताच रक्त वाहण्यास सुरुवात झाली. पांडेने हे कृत्य केल्यानंतर महासभेच्या सदस्य आणि समर्थकांना मिठाई वाटली. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे अखिल भारत हिंदू महासभेशी जोडलेला होता. गांधी पुण्यतिथी अखिल भारत हिंदू महासभा नेहमीच शौर्य दिवस म्हणून साजरा करते. पण आतापर्यंत गांधीजींच्या पुतळयाला गोळी मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली नव्हती. मात्र, यंदा त्यांनी आपल्या विकृत वागण्याचा कळस केला. देशात सर्वच स्तरातून हिंदू महासभेच्या या कृत्याचा निषेध करण्यात आला होता. तसेच पूजा पांडेवर कठोर कारवाईची मागणी होत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणी गप्प का आहेत? असा सवालही अनेकांनी विचारला होता.

Leave a Comment