मोदींच्या ‘मन की बात’ला टक्कर देणार काँग्रेसची ‘अपनी बात राहुल के साथ’

rahul-gandhi
गेल्या काही दिवसांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी क्रियाशील झाल्याचे दिसत आहेत. ते जनतेशी संवाद साधण्यासाठी नेहमी विविध माध्यमांचा वापर करताना दिसत आहेत. राहुल यांनी विद्यार्थ्यांबरोबर नुकताच भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांनी त्याबाबतचा एक व्हिडिओ शेअर करत विद्यार्थ्यांकडून खूप काही शिकायला मिळाल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी देशभरातून आलेल्या काही विद्यार्थ्यांची मी भोजनाप्रसंगी भेट घेतली. ती भेट अत्यंत महत्वपूर्ण ठरली. विचारांची देवाण-घेवाण आमच्यात झाली. मी यातून खूप काही शिकलो, असे राहुल यांनी व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे. ते या व्हिडिओत विद्यार्थ्यांबरोबर मोदी सरकार, शिक्षण व्यवस्था तसेच काही इतर महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करताना दिसतात. काँग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी ‘अपनी बात राहुल के साथ’ हा उपक्रम सुरू केल्याचे सांगण्यात येते.

राहुल गांधी हे ‘अपनी बात राहुल के साथ’ च्या पहिल्या भागात विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख करून देताना दिसतात. मी राहुल गांधी. काँग्रेसचा अध्यक्ष आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. राहुल यांनी दिल्लीतील एका रेस्तराँमध्ये विद्यार्थ्यांची भेट घेतली. मी युवकांशी चर्चा करण्याचा निर्णय युवकांचे विचार काय आहेत हे जाणून घेण्यासाठी घेतल्याचे राहुल यांनी म्हटले. हा व्हिडिओ काँग्रेसने शेअर केला आहे. युवकांचे विचार लक्षपूर्वक ऐकताना यात राहुल दिसतात.


माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, या विद्यार्थ्यांना त्यांच्या पक्षातील एक नेता बोलणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले होते. राहुल गांधींचे नाव त्यांनी सांगितले नव्हते. राहुल गांधी ज्यावेळी त्यांच्यासमोर आले तेव्हा त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. राहुल यांचा हा व्हिडिओचा संबंध २०१९ च्या लोकसभा निवडणुकीशी राजकीय क्षेत्रातील जाणकारांनी जोडला आहे. मोदींच्या प्रचाराचा भाग असलेल्या ‘चाय पर चर्चा’ हे अभियान गत निवडणुकीपूर्वी लोकप्रिय झाले होते. सध्या मोदी सरकारविरोधात राहुल गांधीही आक्रमक झाले आहेत. विविध प्रसंगी त्यांनी मोदींवर टीका केली आहे. यापूर्वी ‘मन की बात’ वरही त्यांनी टीका केली आहे. मोदींचा संवाद हा एकतर्फी असतो. मोदींना जनतेचे म्हणणे ऐकायचे नसते, असे त्यांनी यापूर्वी म्हटले होते.

Leave a Comment