पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा दारूण पराभव

newzeland
वेलिंग्टन : जगातील सर्वोत्तम फलंदाजांची फळी असलेल्या भारतीय संघाला न्युझीलंड संघाने दिलेल्या 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले. पाहुण्या भारताला न्यूझीलंडने 139 धावांवर रोखले आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हा सामना न्यूझीलंडने 80 धावांनी जिंकला.

न्यूझीलंडला कॉलीन मुन्रो आणि टीम सेइफर्ट यांनी शानदार सुरुवात करून दिली. सुरुवातीपासूनच दोघांनी आक्रमक खेळ करताना भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. 43 चेंडूंत सेइफर्टने 7 चौकार व 6 षटकार खेचून 84 धावा केल्या. त्याला मुन्रो ( 34), कर्णधार केन विलियम्सन ( 34), रॉस टेलर (23) आणि स्कॉट कुगलेंजने (20*) यांनी साथ दिली. भारताकडून हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. 20 षटकांत न्यूझीलंडने 6 बाद 219 धावांचा डोंगर उभा केला.

शिखर धवन व विजय शंकर वगळता भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांना 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा (1), रिषभ पंत (4), दिनेश कार्तिक (5), हार्दिक पांड्या (4) यांनी निराश केले. भारताच्या फलंदाजांना इश सोधी व मिचेल सँटनर यांनी स्वस्तात बाद केले. खेळपट्टीवर महेंद्रसिंग धोनी होता खरा, परंतु धावा आणि चेंडू यांच्यातील वाढलेले अंतर कमी करण्यात तो अपयशी ठरला. धोनी 39 धावांवर बाद झाला.

Leave a Comment