अशी आहेत अभिनेत्री दीपिका पदुकोन विषयी काही रोचक तथ्ये

deepika-padukone

अभिनेत्री दीपिका पदुकोन हिचा पहिलाच चित्रपट ‘ओम् शांती ओम्’ सुपरहिट ठरला आणि त्यानंतर दीपिकाने मागे वळून कधी पाहिलेच नाही. एक पाठोपाठ अनेक यशस्वी चित्रपट देत दीपिका आजच्या काळातल्या बॉलीवूडमधल्या सर्वाधिक यशस्वी अभिनेत्रींपैकी एक ठरली आहे. तिच्या प्रमुख भूमिका असलेले ‘पिकू’, ‘गोलियों की रासलीला- रामलीला’, ‘बाजीराव-मस्तानी’ आणि अलीकडच्या काळामध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ ने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळविले. दीपिकाने ‘xxx रिटर्न ऑफ झँडर केज’ या हॉलीवूड चित्रपटाद्वारे आपली ओळख समस्त जगाला करून दिली. जाणून घेऊ या दीपिका बद्दल आणखी काही रोचक तथ्ये.

deepika-padukone2
दीपिकाचा जन्म भारतामध्ये झाला नसून, डेन्मार्क देशातील कोपनहेगन येथे १९८२ साली झाला. दीपिका केवळ अकरा महिन्यांची असताना तिच्या परिवाराने भारतामध्ये स्थलांतर केले. दीपिकाचे वडील प्रकाश, आई उज्जाला, बहिण अनिशा आणि खुद्द दिपिका या सर्वांच्याच नावाचा अर्थ ‘प्रकाश’ असा आहे. भारतामध्ये आल्यानंतर तिचे कुटुंब बेंगळूरू येथे स्थायिक झाले. दीपिकाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यामागचा किस्सा अतिशय रोचक आहे. हिमेश रेशमियाच्या २००६ साली प्रदर्शित झालेल्या म्युझिक व्हिडियोमधील एका गाण्यामध्ये दीपिकाला फरहा खानने पाहिले. तिला पाहताच फरहाने तिच्या आगामी चित्रपटासाठी दीपिकाला प्रमुख भूमिका देण्याचे निश्चित केले. हा चित्रपट होता ‘ओम् शांती ओम्’. तत्पूर्वी दीपिकाने भूमिका केलेला ‘ऐश्वर्य’ हा कन्नड चित्रपट प्रदर्शित झाला होता. दीपिकाने फरहाच्या चित्रपटामध्ये शाहरुख खान सोबत भूमिका करण्याची संधी मिळणार या आनंदात या चित्रपटासाठी कोणतेही मानधन घेतले नव्हते.

deepika-padukone1
दीपिकाच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या प्रमाणे दीपिकालाही खेळांची आवड आहे. दीपिकाचे पिता प्रकाश पदुकोन प्रथितयश बॅडमिंटनपटू असून दीपिकाची बहिण अनिशा नावाजलेली व्यावसायिक गोल्फपटू आहे. दीपिकाने बॅडमिंटनचे कौशल्य आपल्या वडिलांकडून आत्मसात केले असून ती राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू होती. त्याचप्रमाणे दीपिकाला उत्तम बेस बॉल खेळता येत असून त्यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये दीपिका सहभागी झाली आहे. वयाच्या आठव्या वर्षीपासून काही जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली असल्याने दीपिका लहानपणापासूनच कॅमेरा समोर वावरत आली आहे. या जाहिरातींमध्ये २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘लिरील’ साबणाच्या जाहिरातीनंतर दीपिकाला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळू लागली.

२००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘चांदनी चौक टू चायना’ या चित्रपटामध्ये कराव्या लागलेल्या अनेक स्टंट्स साठी दीपिकाने ‘बॉडी डबल’चा वापर न करता ‘जुजुत्सु’ हे मार्शल आर्ट स्वतः शिकून घेऊन सर्व स्टंट सीन्स स्वतः केले. दीपिकाच्या प्रमुख भूमिका असलेल्या, एकाच वर्षात प्रदर्शित झालेल्या चार चित्रपटांनी शंभर कोटींच्या वर कमाई केली असून, या प्रचंड यशामुळे दीपिका आजच्या तारखेला बॉलीवूड मध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या भूमिका असलेले ‘रेस -२’, ‘यह जवानी है दिवानी’, ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या एकाच वर्षी प्रदर्शित झालेल्या चार चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. दीपिकाने ‘कोच्चडाइयां’ नामक एका तमिळ अॅनिमेटेड चित्रपटामध्येही भूमिका केली असून हा चित्रपट भारतातील सर्वप्रथम ‘फोटोरियलिस्टिक मोशन पिक्चर’ होता, म्हणजेच यामध्ये हुबेहूब अभिनेत्यांप्रमाणे दिसणाऱ्या त्यांच्या अॅनिमेटेड प्रतिकृती दाखविण्यात आल्या होत्या. या चित्रपटामध्ये रजनीकांत, अमिताभ बच्चन, अजय देवगण इत्यादी मोठ्या कलाकारांच्याही भूमिका होत्या.

Leave a Comment