ऐश्वर्या राय बच्चनबद्दल ही तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का?

Aishwarya-Rai
सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. मात्र काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधत्व करून विश्वसुंदरीचा खिताब मिळविलेल्या या सौंदर्यवती अभिनेत्रीबद्दलची काही तथ्ये कदाचित आपल्याला ठाऊक नसतील. ही तथ्ये जाणून घेऊ या. ऐश्वर्याची समस्त देशाला ओळख, ती मिस इंडिया बनल्यावर झाली असली, तरी त्या पूर्वी ही ऐश्वर्या टीव्हीवर झळकली होती. त्या काळी टीव्हीवर प्रसारित करण्यात येणाऱ्या ‘कॅमलिन पेन्सिल्स’च्या जाहिरातीमध्ये ऐश्वर्या, वयाच्या चौदाव्या वर्षी सर्वप्रथम दिसली होती.
Aishwarya-Rai1
आपली कारकीर्द नेमकी कोणत्या क्षेत्रामध्ये घडवायची याबद्दल ऐश्वर्याच्या मनामध्ये अनेक गोंधळ सुरु असत. ऐश्वर्याला आधी वैद्यकशास्त्राचे शिक्षण घ्यायचे होते. पण काही कारणाने तिने हा विचार बदलला आणि स्थापत्यशास्त्राची पदवी घेण्यासाठी मुंबईतील ‘रचना संसद अकॅडमी ऑफ आर्कीटेक्चर’ येथे प्रवेश घेतला. त्यानंतर मात्र मॉडेलिंगची संधी चालून आल्याने ऐश्वर्याने स्थापत्यशास्त्राचे शिक्षण सोडून देऊन आपले सर्व लक्ष मॉडेलिंगवरच केंद्रित केले. त्यानंतर प्रसारित झालेल्या पेप्सीच्या जाहिरातीमध्ये झळकल्यानंतर ऐश्वर्या खऱ्या अर्थाने लोकप्रिय होऊ लागली.
Aishwarya-Rai2
मिस वर्ल्ड सौंदर्यस्पर्धेमध्ये भाग घेण्यापूर्वी ऐश्वर्या, आमिर खान आणि महिमा चौधरी यांच्या ‘पेप्सी’च्या जाहिरातीने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. ही जाहिरात १९९३ साली प्रसारित करण्यात आली होती. ऐश्वर्याने आपल्या चित्रसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटांपासून केली. मणिरत्नम यांच्या ‘इरुवर’ या चित्रपटाद्वारे ऐश्वर्याने १९९७ साली चित्रसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्याच वर्षी ‘और प्यार हो गया’ या चित्रपटाच्या द्वारे ऐश्वर्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

लंडन येथील सुप्रसिद्ध मादाम तुसाद्स वॅक्स म्युझियममध्ये ऐश्वर्याचा मेणाचा पुतळा असून, हा मान मिळालेली ऐश्वर्या पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. तसेच २००३ साली आयोजित ‘cannes’ चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी मेम्बर म्हणून निवड झालेली ऐश्वर्या पाहिली भारतीय अभिनेत्री ठरली. ऐश्वर्याच्या सौंदर्याने मोहून गेलेले तिचे चाहते केवळ भारतातच नाही, तर जगभरात आहेत. किंबहुना नेदरलँड्समधील ‘क्युकेनहॉफ ट्युलिप गार्डन’मधील ट्युलिपच्या एका प्रजातीला ऐश्वर्याचे नाव देण्यात आले आहे. अभिनय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल ऐश्वर्याला २००९ साली ‘पद्मश्री’ देऊन गौरविण्यात आले. तसेच फ्रेंच सरकार तर्फे ही ऐश्वर्याला सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Comment