अमित शहा आणि पंकजा मुंडेंच्या बँकेत जमा झाला काळा पैसा : सिद्धू

navjoyt-sidhu
पुणे : पुण्यात भारती अभिमत विद्यापीठात पत्रकार परिषदेत माजी क्रिकेटर आणि काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी विविध विषयांवर फटकेबाजी केली. त्यांनी सीबीआय कारवाई, नोटाबंदी, बेरोजगारी आणि काळ्या पैशावरुन सडकून टीका केली. सीबीआय, रॉ आणि न्यायालयासह अनेक संस्था पपेट झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर या संस्था नाचत असल्याचा आरोप सिद्धू यांनी केला. तर भाजपाध्यक्ष अमित शहा आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या बँकात नोटाबंदीनंतर काळा पैसा आल्याचा आरोप त्यांनी केला.

सिद्धू यांनी यावेळी बोलताना नोटाबंदीवरुन भाजपला लक्ष्य केले. हजारो लोक नोटाबंदीमुळे बेरोजगार झाले. रोखीवर देशाची अर्थव्यवस्था ही अवलंबून आहे. 93 टक्के नागरिक कॅशचा व्यवहार करतात. पण कॅशलेस हा तुघलकी निर्णय घेतल्याचा आरोप सिद्धू यांनी केला. काळा पैसा हा देशात लपवून ठेवल्याचे सरकार म्हणत होते. पण काळा पैसा हा परदेशात सोनं, स्थावर मालमत्तामध्ये असून हा पैसा देशात आला नसल्याचे सिद्धू यांनी म्हटले आहे. स्वीस बँकेत ज्येष्ठ विधिज्ञ जेठमलानी यांचे करोडो रुपये असल्याचे सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 1400 नागरिकांचा पैसा स्वीस बँकेत असून हा पैसा आला का, असा सवाल सिद्धू यांनी केला आहे. नोटाबंदी नंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या बँकेत साडेसातशे कोटी पाच दिवसात जमा झाले. तर महाराष्ट्रात जयंतीभाई आणि पंकजा मुंडे यांच्या बँकांत पैसा जमा झाल्याचा आरोप सिद्धू यांनी केला आहे.

Leave a Comment