मोदींच्या सोबतच माझी राजकारणातून निवृत्ती – स्मृती इराणी

smriti-irani
पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या वर्ड्स काऊंट फेस्टिव्हलमध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीविषयीचा एक महत्त्वाचा निर्णय सर्वांसमोर मांडला. त्यांनी या कार्यक्रमात प्रधान सेवक असा नरेंद्र मोदींचा उल्लेख करत सक्रिय राजकारणातून ते जेव्हा निवृत्ती घेतील त्याचवेळी आपणही राजकीय वर्तुळातून निवृत्त होणार असल्याचे स्पष्ट केले.

मी राजकारणात अतिशय प्रभावी अशा पुढाऱ्यांच्या, नेतेंमंडळींच्या नेतृत्वात प्रवेश केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केले. मला दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे नशीबच समजते. मी सध्या प्रधान सेवक नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात काम करत असल्याचे इराणी म्हणाल्या.

त्यांनी यापुढे एक महत्त्वाचे विधानही केले. प्रधान सेवक नरेंद्र मोदी ज्या दिवशी राजकारणातून निवृत्ती घेतील, त्या दिवशी भारतीय राजकारणातून मीसुद्धा निवृत्ती घेईन, असे त्यांनी म्हटला आहे. इराणी यांनी या कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या मुलाखतीत भाजपच्या राजकीय धोरणांविषयीसुद्धा वक्तव्य केले.

सरकारचा विकासाच्या मुद्द्यावर भर असून, एक राजकीय पक्ष म्हणून राजकारण हे करावेच लागते, असे असले तरीही विकासाचा मुद्दाच आमच्यासाठी (पक्षासाठी) सर्वतोपरी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षश्रेष्ठींचा निर्णय हाच आगामी लोकसभा निवडणूकांच्या बाबतीत अंतिम निर्णय असेल असेही त्या म्हणाल्या. तेव्हा राजकारणात आता स्मृती इराणी यांची कारकीर्द कुठवर चालणार आणि यापुढे पक्षाकडून त्यांच्यावर नेमकी कोणती जबाबदारी सोपवण्यात येणार हे पाहणेही तितकच महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment