जपानची अशीही समस्या – आता वृद्धांमध्ये गुन्हेगारीचे वळण

japan
संपूर्ण जगभरात तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळण्याची समस्या असताना जपानमध्ये वेगळीच समस्या समोर येत आहे. जपानमध्ये सध्या ज्येष्ठ नागरिकांकडून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण अचानक वाढले असून यातील अनेकांनी तुरुंगात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गरिबीमुळे आणि सांभाळायला कोणी नसल्यामुळे हे वृद्ध गुन्हा करून तुरुंगात जातात. वीस वर्षांपूर्वी एकूण गुन्हेगारांमध्ये 20 टक्के ज्येष्ठ नागरिक असत. मात्र आज ही संख्या 20 टक्क्यांवर गेली आहे.

“मी गरीब आहे आणि मला राहण्यासाठी कुठेतरी मोफत जागा पाहिजे. ती तुरुंगात असली तरी चालेल,” असे 69 वर्षांच्या तोषिओ ताकाटा या व्यक्तीने बीबीसीला सांगितले.

तोषिओ याने गेल्या आठ वर्षांत एकामागोमाग गुन्हे करून चार वर्षे तुरुंगात काढली आहेत. त्याच्यासारख्या अनेक जणांनी गुन्हे करण्याचा मार्ग पत्करला आहे.

वर्ष 2016 मध्ये 2500 गुन्हेगार 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. त्यातील एक तृतीयांश जण पुन्हा गुन्हा करणारे होते. दुकानांमधून वस्तू चोरणे हा जपानच्या वृद्ध लोकांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा गुन्हा आहे. जपानमध्ये मिळणारे निवृत्ती वेतन अत्यंत अल्प असल्यामुळे वृद्धांना त्यावर गुजराण करणे अवघड झाले आहे. त्यामुळे ही गुन्ह्याची लाट आली आहे. असे तज्ञांचे मत आहे.

Leave a Comment