विरोधकांची महाआघाडी म्हणजे महा’ठग’बंधन : पूनम महाजन

poonam-mahajan
मुंबई : मुंबईत सोमय्या मैदानावर आयोजित भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभात भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा आणि मुंबईतील भाजप खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामासोबत केली आहे. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांची महाआघाडी म्हणजे महा’ठग’बंधन असल्याचा घणाघातही केला.

रामायणातील मंथरा, तर महाभारतातील शकुनी मामा आहेत शरद पवार. या महाआघाडीत सगळ्यांचे ऐकल्याचे दाखवून शकुनी मामासारखे नाक खुपसून सगळीकडे महाभारत सुरु करणारे शरद पवारही आहेत. स्वत:ला मिळाले नाही, की इकडचे तिकडे, तिकडचे इकडे करणाऱ्या मंथरा आणि शकुनीसारखी पवारांची अवस्था आहे. मोदींच्या विकासरथाला असे हे सगळे मिळून अडवू पाहत आहेत. परंतु भाजपचे कमळच महाआघाडीच्या दलदलीत उमलेल असा विश्वास पूनम महाजन यांनी व्यक्त केला.

फक्त आपल्या आईचे ऐकणारे आणि राफेल-राफेल करणारे राहुल गांधी हे ‘राफूल’ आहेत. तर प्रियांका गांधी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती म्हणजे ‘बेटी लाओ और बेटा बचाओ’ कार्यक्रम असल्याचेही पूनम महाजन म्हणाल्या. काँग्रेसने प्रियांकांचे इतके फोटो पसरवले, की ती तैमूर अली असल्यासारखेच वाटत असल्याचेही महाजन म्हणाल्या.

Leave a Comment