
पंढरपूर : प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी दिलेला अल्टीमेटम संपल्यामुळे लोकसभेच्या सगळ्या ४८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माळशिरस तालुक्यातील माळीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा आयोजित करण्यात आला होता. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडी राज्यातील सगळ्या जागा लढणार असल्याचे सांगितले.
लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागा लढणार वंचित बहुजन आघाडी – प्रकाश आंबेडकर
आमची काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छा होती, त्यासाठी चर्चाही झाली, पण गैरसंविधानवादी आणि संविधान न मानणाऱ्या आरएसएसशी आमचा लढा आहे. संविधानाच्या चौकटीत आरएसएसला आणण्यासाठी काँग्रेसचा आराखडा त्यांनी द्यावा, अशी मागणी केली होती, पण काँग्रेस नेते यावर काहीच बोलत नसल्याचे वक्तव्य आंबेडकर यांनी केले.
एमआयएमचा काँग्रसेने पहिल्यांदा बागुलबुवा उभा केला, पण तो विषयही ओवेसींनी सांगितल्यानंतर संपला, तरी काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याची खंत प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवली. आघाडी करण्यासाठी दिलेली ३० जानेवारीची मुदत संपली असल्याने आमचा नाईलाज झाल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच आता जिथे सभा होईल तिथे आमचा उमेदवार घोषित केला जाईल, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.
