12 वर्षानंतर आयफोनच्या किमतीत घट होण्याची शक्यता

iphone
मुंबई : भारतात तरुणाईमध्ये स्टेट्स सिम्बॉल असलेला आयफोन स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात असून आयफोनच्या विक्रीवर मागील काही दिवसांपासून परिणाम होत असल्याने चीन आणि भारतात कंपनीला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे आयफोनच्या किमतीत 12 वर्षानंतर घट होणार असल्याची माहिती आहे.

याबाबतची माहिती आयफोन कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी दिली आहे. आयफोनच्या किमतीत यापूर्वी 2007 मध्ये घट करण्यात आली होती. पण आयफोन कंपनीकडून कोणत्या देशात स्वस्त करण्यात येणार आहे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. पंरतू आयफोनच्या किमतीत चीनमध्ये घट करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आलेल्या आयफोन एक्सएसची किंमत कंपनीने 999 डॉलर ठेवली होती. या रणनीतीचा फायदा अमेरिकेत झाला. पण कंपनीला चीन, भारत आणि तुर्कीसारख्या देशात फटका बसला होता. त्यामुळे इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत डॉलरचा भार कंपनी उचलेल, असा निर्णय कंपनीने घेतला आहे.

आयफोन कंपनीसाठी भारत महत्वाचा बाजार असल्याचे कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी सांगितले. भारत सरकारकडून कंपनीला टॅक्समध्ये सवलत हवी आहे. जेणेकरुन भारतात हँडसेट अॅसेंबलींग आणि स्टोर सुरु करता येईल, असे कुक म्हणाले. काउंटर पॉईंटच्या अहवालानुसार भारतात 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये आयफोनच्या शिपमेंट्स 50 टक्क्याने कमी झाल्या होत्या. एकंदरीत आयफोन कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे भारतात आयफोनच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment