अर्थसंकल्प 2019 – …अन् संसद मोदींच्या जयघोषने दुमदुमली !

narendra-modi
नवी दिल्ली – आज संसदेमध्ये हंगामी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी आपल्या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. मध्यमवर्गीयांसाठी सर्वात मोठी घोषणा या अर्थसंकल्पात ठरली. पाच लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आल्याची घोषणा गोयल यांनी संसदेमध्ये केली. ही घोषणा गोयल यांनी करताच भाजप खासदारांनी लोकसभेत ‘मोदी मोदी मोदी’ अशा घोषणा दिल्या. मोदी सरकारने निवडणुकांआधी मध्यमवर्गींयांना दिलेला हा सर्वात मोठा दिलासा आहे. याचा फायदा ३ कोटी करदात्यांना होणार आहे.

पियुष गोयल यांनी आपल्या ९० मिनिटांच्या या भाषणामध्ये मोदी सरकारने मागील साडे चार वर्षांमध्ये केलेल्या कामाचा पाढा वाचला. गोयल यांनी शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, जवान, गरीब, मध्यमवर्गीय अशा सर्वांसाठी वेगवेगळ्या घोषणा केला. मोदींनी गोयल यांच्या भाषणादरम्यान अनेकदा बाक वाजवून अनुमोदन दिले. अनेक घोषणा केल्यानंतर मोदी हसताना दिसले. गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेवटच्या २० मिनिटांमध्ये करप्रणालीमधील बदलांसंदर्भात घोषणा करण्यास सुरुवात केली. त्यांनी यामध्ये पहिलीच घोषणा करताना पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व मध्यमवर्गीयांना १०० टक्के करमुक्ती जाहीर केली. पंतप्रधान मोदी या घोषणेनंतर बाक वाजवून हसू लागले. त्यानंतर संसदेमधील भाजपच्या सर्व खासदारांनी ‘मोदी.. मोदी.. मोदी..’चा जयघोष केला.

Leave a Comment