न्यूझीलंडची टीम इंडियावर 8 गडी राखून मात

new-zeland
हॅमिल्टन – हॅमिल्टन येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 8 गडी राखून मात करत यजमान न्यूझीलंडने आपला पहिला विजय नोंदवला आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारताने विजयासाठी दिलेले 93 धावांचं आव्हान सहज पूर्ण केले. सामन्यात भारताकडून भुवनेश्वर कुमारने 2 बळी घेतले. न्यूझीलंडने या विजयासह भारताचे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत खेळणारा भारतीय संघ पुरता उघडा पडला.

त्याआधी, भारतीय संघाला चौथ्या सामन्यात खऱ्या अर्थाने कडवी टक्कर मिळाली आहे. ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी-ग्रँडहोमच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाचा डाव हॅमिल्टनच्या मैदानात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारतीय संघाची हवेत वळणाऱ्या चेंडूवर अक्षरशः दाणादाण उडाली. एका क्षणापर्यंत धावफलकावर 50 धावा लागायच्या आधी भारताचा निम्मा संघ माघारी परतल्यामुळे भारत एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपला नवा निच्चांक नोंदवतो की काय असे चित्र निर्माण झाले होते. पण भारतावर आलेली ही नामुष्की हार्दिक पांड्याने टाळली. पण फारकाळ तो ही खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. अखेर भारताने 92 धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळवले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 10 षटकात 21 धावांमध्ये 5 तर कॉलिन डी-ग्रँडहोमने 10 षटकात 26 धावांमध्ये 3 बळी घेतले. या दोघांना टॉड अॅस्टल आणि जिमी निशम यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेत चांगली साथ दिली.

Leave a Comment