पर्रिकरांमुळे निर्माण झालेल्या ‘त्या’ वादावर राहुल गांधींचा खुलासा

rahul-gandhi
नवी दिल्ली – राहुल गांधींनी पर्रिकर यांच्यासोबतच्या आपल्या भेटीदरम्यानची कुठलीही गोष्ट फोडलेली नसून आपण तेच बोललो जे आतापर्यंत बोलत आलो आहे, असे म्हणून खुलासा केला आहे. त्यांनी मनोहर पर्रिकरांची भेट घेऊन आल्यावर राफेल कराराविषयी पर्रिकरांना माहित नव्हते, असे विधान केले होते. पर्रिकरांसह अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांनी त्यानंतर त्यांच्यावर टीका केली होती.

राहुल गांधी पत्रात म्हणाले, की आपल्या भेटीतील कोणतीच गोष्ट मी उघड केली नाही. विरोधी पक्षाचा नेता म्हणून या देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारणे माझा लोकशाहीतील अधिकार आहे. पंतप्रधानांप्रती तुमची निष्ठा तुम्हाला दाखवणे आवश्यक आहे, हे मी समजू शकतो. जे आधीच माध्यमांसमोर आहे तेच मी बोललो. मोदींनी २०१५ मध्ये राफेल करार केला तेव्हा तुम्हाला याबद्दल माहीत नव्हते, असे तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते. गांधी यांनी पर्रिकरांना याची आठवण करुन दिली.

दरम्यान, राहुल गांधी मंगळवारी गोव्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर लगेच एका सभेमध्ये त्यांनी राफेलबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, की राफेल कराराविषयी मला माहित नव्हते, असे पर्रिकरांनी मला सांगितले. मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना पत्र लिहले. यात ते म्हणाले, की आपल्या भेटीत राफेलबाबत काहीच बोलणे झाले नाही. तुम्ही धडधडीतपणे खोटे बोलत आहात. अमित शहा यांनी देखील यावरुन राहुल गांधींवर टीका केली होती.

Leave a Comment