ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी प्रत्यार्पण केलेल्या सक्सेना आणि तलवारची ईडीकडून चौकशी

augusta
नवी दिल्ली – दुबईतून भारतात प्रत्यार्पण ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी राजीव सक्सेना या आरोपीचे करण्यात आले असून दीपक तलवारलाही सक्सेनासोबत भारतात आणले गेले आहे. यापूर्वी भारतात याप्रकरणातील मुख्य आरोपी ख्रिश्चन मिशेलचे प्रत्यार्पण करण्यात आले होते.

ईडीकडून सक्सेना आणि तलवार या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू झाली असून ईडीच्या दोन टीम दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही आरोपींना प्रश्न विचारत चौकशी करत असल्याची माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली. राजीव सक्सेनावर ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात ९० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सक्सेना आणि तलवार यांना विशेष विमानाने दिल्लीला पोहोचवण्यात आले. दोन्ही आरोपींना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले आहे. यूएई सरकारने मागील वर्षी डिसेंबरमध्ये ख्रिस्तियन मिशेलचे प्रत्यार्पण केले होते. मिशेल हा ब्रिटिश नागरिक असून या खरेदीमध्ये त्याने मध्यस्थाची भूमिका निभावली आहे. हा ३ हजार ६०० कोटींचा अत्यंत महत्त्वाच्या हेलिकॉप्टर्सच्या खरेदीचा व्यवहार होता.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये दुबईस्थित उद्योगपती सक्सेना याच्या जामीन अर्जाची सुनावणी सुरू असताना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) न्यायालयाला त्याच्या प्रत्यर्पणासंबंधी विनंती केली होती. त्याला वारंवार चौकशीसाठी बोलावले असतानाही तो उपस्थित न राहिल्याने ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने मागील वर्षी ६ डिसेंबरला सक्सेना याच्या अजामीनपात्र वॉरंटवर सुनावणी घेतली होती. सक्सेना चौकशीला प्रतिसाद देत नसल्याचे ईडीने कळवल्यानंतर ही कारवाई केली होती. तसेच, सक्सेना याची पत्नी शिवानी हिच्यासह त्याचेही नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले होते.

Leave a Comment