राहुल गांधी हे ‘हायब्रीड स्पेसिमन’, काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधींवर वादग्रस्त टीका

anantkumar-hegde
बंगळुरू – केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी राहुल गांधी हे ‘हायब्रीड स्पेसिमन’ (संकरित वाण) असल्याचे म्हणत काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधींवर वादग्रस्त टीका केली आहे. त्याचबरोबर हेगडे यांनी मुस्लीम वडील आणि ख्रिश्चन आई असलेला व्यक्ती ब्राह्मण कसा असू शकतो, असा सवालही उपस्थित केला.

राहुल राफेल प्रकरणावरुन सातत्याने मोदींवर टीका करत आहेत. हेगडे यांनी यावरुनही राहुल यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल यांना धर्माबाबत काहीच माहिती नसल्याचेही हेगडे म्हणाले. तुम्हाला जगातील कुठल्याच प्रयोगशाळेत राहुल यांच्यासारखा संकरित वाण पाहायला मिळणार नाही. केवळ आमच्या देशातील काँग्रेसच्या प्रयोगशाळेतच त्याचा नमुना आहे, अशा शब्दांत हेगडे यांनी राहुल यांच्यावर टीका केली.

राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान एका मंदिरात पुजेदरम्यान आपण ब्राह्मण असून दत्तात्रेय हे आपले गोत्र असल्याचे सांगितले होते. नुकतेच हेगडे यांनी एक विधान केले होते. हिंदू मुलीला जो हात लावेल त्याचे हात राहणार नाहीत, असे हेगडे म्हणाले होते. यानंतर दोनच दिवसांनंतर हेगडे यांनी राहुलवर टीका केली. राहुल गांधी राफेल, राफेल ओरडत आहेत. त्यांना राफेलचे स्पेलिंगही नीट येत नाही. त्यांना वाटते राफेल ही ३ चाकी सायकल आहे, असेही हेगडे म्हणाले.

Leave a Comment