बीए दुसऱ्यावर्षाच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘दहशतवादी’ असा उल्लेख

sawarkar
नाशिक – स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित दहशतवादी असा उल्लेख नाशिक स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बीए दुसऱ्यावर्षाच्या इतिहासाच्या मराठी पुस्तकात करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित जहालवादी, दहशतवादी असे शब्द इतिहासाच्या या पुस्तकात वापरण्यात आले आहेत. यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेतल्यानंतर सावरकरांशी संबंधित असलेल्या भाग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढयात महत्वपूर्ण योगदान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याशी संबंधित असलेल्या भागात सुधारणा करण्यात येणार असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

थेट स्वातंत्र्यवीर सावरकरांना जहालवादी, दहशतवादी हे शब्द उद्देशून वापरण्यात आलेले नाहीत. हे पुस्तक २००१ साली लिहिण्यात आले आहे. ते अजून मी पाहिलेले नाही. हा उल्लेख फक्त मराठी माध्यमाच्या पुस्तकात आहे. अनावश्यक वाद आम्हाला निर्माण करायचा नसल्यामुळे हा उल्लेख वगळून आम्ही पुस्तकात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु ई. वायूनंदन यांनी दिली.

हे शब्द ७० वर्षांपूर्वी वापरले जायचे. हे शब्द आज तसेच ठेवणे चुकीचे आहे. आम्ही चूक मान्य करतो असे प्रादेशिक संचालक नारायण मेहरे म्हणाले. युवा वर्ग भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांकडून प्रेरणा घेत असतो. अशा प्रकारे ऐतिहासिक तथ्यांशी मोडतोड करुन स्वातंत्र्य सैनिकांना दहशतवादी संबोधण अजिबात स्वीकार करणार नाही असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे वैभव बावनकर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment