राष्ट्रवादी-मनसेचे लोकसभेसाठी मनोमिलन होणार का?

election
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी लोकसभा निवडणुकीत एकत्र येणार अशी चर्चा असतानाच यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणातला कोणताही दरवाजा बंद नसतो. पण सध्या ‘आघाडी’संदर्भात राष्ट्रवादी आणि मनसेत कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तर पक्षाकडून यासंदर्भात कोणतेही आदेश आले नसल्याचे मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील जवळीक गेल्या काही महिन्यांपासून वाढत आहे. शरद पवारांची पुण्यात राज ठाकरे यांनी मुलाखत घेतल्यानंतर राज ठाकरे आणि शरद पवारांनी एकत्र विमानप्रवासही केला होता. शरद पवार कुटुंबीय अमित ठाकरे यांच्या लग्नातही उपस्थित असल्यामुळे शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातील दुरावा कमी होत असल्याची चर्चा सुरु झाली.

मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीसंदर्भात प्रस्ताव दिल्याचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध झाल्याने या चर्चेला बळ मिळाले. मनसेला ईशान्य मुंबई, ठाणे आणि दिंडोरी या लोकसभेच्या तीन जागा मिळाल्यास आघाडीस तयार आहोत, असा प्रस्ताव मनसेने राष्ट्रवादीला दिल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीशी आघाडी करण्यासंदर्भात आम्हाला कोणतेही निर्देश मिळालेले नाही. आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो असून आमचे काम जोमाने सुरु आहे. आम्ही जिंकण्यासाठीच निवडणुकीत उतरणार असल्याचे अविनाश जाधव यांनी नमूद केले. तर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आघाडीसंदर्भात राष्ट्रवादी- मनसेत चर्चा झाल्याची मला कल्पना नाही. पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. अद्याप कोणताही मनसेसंदर्भात निर्णय झालेला नाही. राजकारणातले कोणतेही दार बंद नसते. पण मनसेसोबत सध्या तरी कोणतीही चर्चा नाही, असे त्यांनी सांगितले. आता आगामी काळात हे दोन्ही पक्ष एकत्र येतात का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Comment