22 मार्च रोजी प्रदर्शित होणार ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणावर आधारित वेबसीरिज

delhi-crime
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित आता वेबसीरिज येणार असून ‘दिल्ली क्राइम’ या नावाने या वेबसीरिजची मूळ भारतीय असलेल्या कॅनडाच्या रिची मेहताने निर्मिती केली आहे. ही सीरिज आगामी 22 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

दिल्लीत 2012 मध्ये ‘निर्भया’ वर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी केलेल्या तपासावर ही सीरिज आधारित आहे. शेफाली शाह, आदिल हुसैन, डेंझिल स्मिथ, रसिका दुग्गल, राजेश तैलंग आणि यशस्विनी दायमा हे कलाकार यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. दिल्लीतील चालत्या बसमध्ये 6 डिसेंबर 2012 साली झालेल्या या सामूहिक बलात्कार प्रकरणाने मानवतेला काळीमा फासला होता. संपूर्ण देश या घटनेने पेटून उठला होता. या सत्य घटनेवर आधारित ‘दिल्ली क्राइम’ ही वेबसीरिज सात भागांची असणार आहे.


निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित ‘दिल्ली बस’ हा चित्रपट देखील गेल्याच वर्षी आला होता. या घटनेवर आधारित लेस्ली उडविन यांचा ‘इंडियाज डॉटर’ हा माहितीपटही आला होता. यामुळे मोठा वाद भारतात निर्माण झाला होता. या माहितीपटाच्या प्रदर्शनावर भारतात बंदीही घालण्यात आली होती. ‘दिल्ली क्राइम’ ही सीरिज निर्भया बलात्कार प्रकरणानंतरच्या संपूर्ण तपासावर आधारित आहे. रिची मेहताच्या या वेबसिरिजमध्ये अभिनेत्री शेफाली शहा महिला पोलिस अधिकारी वर्तिक चतुर्वेदीच्या भूमिकेत आहे. रिची मेहताने याआधी ‘अमाल’, ‘आय विल फॉलो यु डाऊन’, ‘सिद्धार्थ’ अशा चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Leave a Comment