अन् सेंडऑफच्या दिवशी बँक कर्मचारी चक्क स्पायडरमॅनच्या वेशात पोहोचला

spiderman
अनेकजण राजीनामा दिल्यानंतर कंपनीतील शेवटचा दिवस लक्षात राहावा यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरतात. काहीजण पार्टी करतात तर काहीजण आठवण म्हणून आपल्या सहकाऱ्यांना भेटवस्तू देतात. पण आपण कधीही विचार केला नसेल अशा पद्धतीने आपला शेवटचा दिवस ब्राझीलमधील एका बँक कर्मचाऱ्याने साजरा केला. हा कर्मचारी कामाच्या शेवटच्या दिवशी चक्क स्पायडरमॅनच्या वेशात ऑफिसमध्ये पोहोचला. त्याचबरोबर त्याने त्याच वेषात दिवसभरातील आपले कामही पूर्ण केले. सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना 51 सेकंदांच्या या व्हिडीओत दिसत आहेत. तसेच तो प्रत्येकाला काहीतरी देतानाही दिसत आहे. कदाचित शेवटचा दिवस असल्याने तो गोड पदार्थ वाटत असावा. पण हे सगळे करत असताना तो स्पायडरमॅनच्या वेशातच असतो. यावेळी त्याला एका कर्मचाऱ्याने मिठीही मारली. काहीजण मोबाइलमध्ये आपल्या या सहकाऱ्याचे अप्रूप वाटणारे सगळे रेकॉर्ड करत असल्याचेही दिसत आहे.

Leave a Comment