
मुंबई – राज्य सरकारला पत्र लिहून पबजी या ऑनलाइन गेमवर बंदी आणण्याची मागणी एका 11 वर्षाच्या मुलाने केली आहे. या मुलाचे नाव आहाद असे असून राज्य सरकारला आहादने चार पानांचे पत्र लिहिले आहे. त्याने या पत्रात पबजी गेम हिंसेला खतपाणी घालत असल्याचे सांगत त्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 11 वर्षाच्या मुलाचे पबजीवर बंदी आणण्यासाठी पत्र
त्याने पत्रात लिहिले आहे की, अनैतिक आचरणाला ज्यामध्ये हिंसा, हत्या, राग, लूटमार, गेमिंग व्यसन आणि सायबर गुंडगिरी अशा गोष्टींना पबजी गेम वाढ देत असून त्याच्यावर बंदी आणली जावी. त्याने पुढे जर गेमवर बंदी आणली नाही तर आपण कायदेशीर मार्गाने त्यासाठी प्रयत्न करु असे म्हटले आहे.
या पत्रात आहादने सात नावांचा उल्लेख केला असून यामध्ये केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासहित इतरांचा समावेश आहे. आहादला पत्रावर कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
