मानाच्या यादीत मराठमोळ्या स्मृती मंधानाने पटकावले पहिले स्थान

smriti-mandhana
आपला फलंदाजीतील सर्वोत्तम फॉर्म भारतीय महिला संघातील फलंदाज स्मृती मंधानाने कायम राखला असून स्मृतीने न्यूझीलंड दौऱ्याच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार मिताली राजसोबत भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्मृतीने दुसऱ्या सामन्यात नाबाद 90 धावांची खेळी करुन सामनावीराचा किताबही पटकावला. स्मृती मंधानाने या खेळीदरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.


स्मृती मंधानाच्या खात्यात दुसऱ्या सामन्यानंतर 78.54 च्या सरासरीने 864 धावा जमा आहेत. न्यूझीलंडच्या सोफी डेव्हिन, दक्षिण आफ्रिकेच्या लिझल ली, इंग्लंडच्या टॅमी बेमाऊंट, न्यूझीलंडच्या सुएझ बेट्स अशा प्रमुख खेळाडूंना मागे टाकून स्मृतीने अव्वल स्थान काबीज केले आहे. भारतीय महिलांनी तब्बल 24 वर्षांनी न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे. भारतीय महिलांनी 1995 साली न्यूझीलंडविरुद्ध शेवटची एकदिवसीय मालिका जिंकली होती. भारतीय महिलांनी दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर 8 विकेट राखून मात केली.

Leave a Comment