सोशल मीडियात व्हायरल झाला मायावतींचा ‘व्हॉट्सअ‍ॅप नंबर’ !

mayawati
लखनऊ : सोशल मीडियापासून बहुजन समाज पक्ष (बसप) अलिप्त असल्याचे दिसत आहे. पण सध्याच्या घडीला सोशल मीडियात व्हायरल होणारी पोस्ट बसपसाठी डोकेदुखी ठरत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बसपच्या उमेदवारांची बनावट यादी गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पक्षाला यावर खुलासा द्यावा लागल्यानंतर आता पुन्हा सोशल मीडियात पक्षाच्या प्रमुख मायावती यांचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच, बसप युवा मोर्चाच्या संघटनेची बातमी व्हायरल होत आहे.

बसपाचे प्रदेशाध्यक्ष आर.एस. कुशवाहा यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. आर. एस. कुशवाहा म्हणाले की, सोशल मीडियात व्हायरल होणारा व्हॉट्सअ‍ॅप नंबर हा मायावती यांचा नाही. हा नकली नंबर असून तो विरोधकांकडून जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात येत आहे. तसेच, आर. एस. कुशवाहा यांनी बसपा युवा मोर्चाचेही खंडन केले आहे. बसपमध्ये युवा संघटना, विद्यार्थी संघटना आणि महिला संघटना अशा कोणत्याही प्रकारच्या संघटना तयार करण्यात आल्या नाहीत. सोशल मीडियात यासंबंधी व्हायरल होणारे पत्र खोटे असल्याचे आर. एस. कुशवाहा यांनी सांगितले.

Leave a Comment