सुंदरतेशिवाय प्रियंका यांच्याकडे काहीच कर्तृत्व नाही, भाजप मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

BJP
नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेसमध्ये प्रियंका गांधींच्या राजकीय प्रवेशामुळे नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असताना दुसरीकडे त्यांच्यावर भाजपमधून वादग्रस्त वक्तव्य सुरु झाली आहेत. दरम्यान बिहारचे मंत्री विनोद नारायण झा यांनी सुंदरतेशिवाय प्रियंका यांच्याकडे काहीच कर्तृत्व नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

प्रियंका गांधींना सक्रीय राजकारणात काँग्रेसने आणल्यापासून देशात त्यावर चर्चा रंगत आहेत. आता यात बिहारच्या या मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य करत वादाला निमंत्रण दिले आहे. मते सौंदर्याने मिळवता येतात, या चुकीच्या गृहितकावर काँग्रेस सध्या चालली आहे. पण सुंदरतेच्या बळावर निवडणूक ही जिंकता येत नाही, असा टोलाही विनोद झा यांनी काँग्रेसला लगावला आहे. काहीही झाले तरी, प्रियंका या घोटाळेबाज आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या रॉबर्ट वाड्राच्या पत्नी असल्याचेही विनोद झा म्हणाले. भारताची लोकशाही परिपक्व होण्याच्या मार्गावर आहे, अशात काँग्रेसचा हा निर्णय लोकशाहीसाठी योग्य नसल्याचेही झा यांनी म्हटले आहे.


बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही झा यांच्या आधी प्रियंका यांच्या राजकीय आगमनावर टीका केली होती. प्रियंका गांधी एक अशा महिला आहेत ज्यांच्या पतीवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, असे मोदींनी म्हटले होते. इंदिरा गांधींसारख्या प्रियंका गांधी दिसतात. पण कुणासारखे दिसण्याने त्यांच्यासारखे कर्तृत्व मिळवता येत नाही. असे असते तर आपल्याकडे कितीतरी अमिताभ बच्चन आणि विराट कोहली असले असते असेही ते म्हणाले. इंदिरा गांधींसारख्या दिसण्यावरून त्यांनी हा टोमणा मारला होता.

Leave a Comment