भाऊ कदमच्या नशीबवानवर मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार संघटनेने घेतला आक्षेप

bhau-kadam
विनोदी अभिनेता भाऊ कदम हा आगामी नशीबवान या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीला आला आहे. पण या चित्रपटामागे लागलेले शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाही. आधी फेसबुकवर थिएटरसाठी हतबल झालेल्या भाऊ कदमने आपली हतबलता व्यक्त केल्यानंतर आता नशीबवानवर पुन्हा एक नवे संकट आले आहे. मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार संघटनेने या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर चित्रपटाशी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सफाई कामगारांबाबत या चित्रपटात अपमानास्पद चित्रण केल्याचा आरोप स्वतंत्र म्युनिसिपल कामगार संघटनेने केल्यामुळे कामगारांची प्रतिमा मलिन होत असून, या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांचीही प्रतिमा या चित्रपटात मलिन केल्याचा दावा सफाई कामगार संघटनेने केला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांविरोधात गुन्हा दाखल करा, या चित्रपटाचे प्रदर्शन रोखा, अशी मागणी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनने केली आहे.

11 जानेवारीला भाऊ कदम यांची मुख्य भूमिका असलेला ‘नशीबवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. भाऊ कदम यांच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री मिताली जगताप-व्हराडकर, नेहा जोशी, अभिनेते जयवंत वाडकर इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनील वसंत गोळे यांनी केले आहे. भाऊ कदम यांनी या चित्रपटात महानगरपालिकेतील एका सफाई कर्मचाऱ्याची भूमिका साकारली आहे.

Leave a Comment