
लखनौ – बसपच्या सर्वेसर्वा मायावतींवर भाजपच्या महिला आमदार साधना सिंह यांनी आक्षेपार्ह टीका केल्यानंतर भाजपच्या आणखी एका आमदाराने त्यांच्याबाबात आक्षेपार्ह विधान केले आहे. साधना सिंह यांच्या वक्तव्याचे समर्थन करत या आमदाराने मायावती यांना चक्क विंचू म्हणून संबोधले आहे. बसप आणि समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या आघाडीमुळे भाजप गोंधळात पडले आहे का, असा प्रश्न आता राजकीय पटलावर निर्माण झाला आहे.
मायावती आणि विंचवामध्ये काहीच फरक नाही – सुरेंद्र सिंह
मायावतींवर उत्तर प्रदेशच्या रोहानिया लोकसभा मतदार संघातून आमदार असलेले सुरेंद्र सिंह यांनी वक्तव्य केले आहे. मायावती महिला असल्या तरी त्यांचा स्वभाव मात्र तृतीयपंथीयांसारखा असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. त्यांनी समाजवादी पक्षाशी आघाडी केली असल्यावरुनही सिंह यांनी मायावतींवर वक्तव्य केले. त्या जहरी डंक मारणाऱ्या विंचू आहेत आणि समाजवादी पक्ष विष सोडणारा साप आहे, अशा खालच्या शब्दात त्यांनी मायावतींवर टीका केली.
