भूतानच्या सीमेत चिनी सैन्याची घुसखोरी, आणखी एका डोकलामची भारताला भीती

Chinese-army
भारत आणि चीनच्या सैन्यांत डोकलाम येथे उद्भवलेल्या कोंडीच्या दीड वर्षानंतर भूतानच्या सीमेवर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. डोकलामच्या जवळच भूतानच्या सीमेवरील आणखी एका भागातून चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आणखी एक डोकलाम तयार होण्याची भारताला भीती आहे.

गेल्या वर्षीच्या शेवटी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) चरिथांग खोऱ्यातील भूतानच्या भूभागात प्रवेश केल्याचे सूत्रांनी सांगितले. या परिस्थितीच्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी भारतीय सुरक्षा संस्थांनी डिसेंबर महिन्यात एक बैठक घेतली, असे न्यूज18 वाहिनीने म्हटले आहे.
पीएलएच्या सैन्याने डोकलाममध्ये अशीच घुसखोरी केली होती त्यामुळे तेथे तैनात असलेल्या भारतीय तुकड्यांना हस्तक्षेप करावा लागला होता. त्यावरून दोन सैन्यांदरम्यान 73 दिवस तणावाचे वातावरण होते.

चीन व भूतान या दोन देशांदरम्यान सीमेचा वाद सोडविण्यासाठी चर्चा सुरू आहे. विशेषतः पश्चिम भूतानमधील डोकलाम, चरिथांग, द्रामाणा आणि सिंचुलुन या भागांवर दोन्ही देशांचा दावा आहे.

भारत आणि चीन दरम्यान 3,488 किलोमीटर लांब प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सीमावाद आहे. सिक्किम व भूतानमधील डोकलाम भागात चिनी सैनिकांनी 2017 मध्ये एक सडक बनविण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भारत व चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. हा तणाव 73 दिवसांपेक्षा अधिक काळ चालू होता.

Leave a Comment