पायी चालण्याच्या बाबतीत अमेरिका आणि साऊथ कोरिया भिन्न

South-Korea
पायी चालणे हा कोरियन जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आणि शरीर सतत सक्रीय ठेवणाऱ्या या सवयीचा कोरियन नागरिकांना रास्त अभिमानही आहे. किंबहुना दक्षिण कोरियातील प्रत्येकाकडे ‘बी एम डब्ल्यू’ आहे असे इथे गंमतीने म्हटले जाते. पण बीएमडब्ल्यूचा अर्थ महागडी बीएमडब्ल्यू गाडी असा नसून, ‘बी’ म्हणजेच बस, ‘एम’ म्हणजे मेट्रो, आणि ‘डब्ल्यू’ म्हणजे वॉकिंग, म्हणजेच चालणे, अशा अर्थी ‘बीएमडब्ल्यू’ दक्षिण कोरियामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनाचा भाग आहे. कोरियामध्ये पायी चालणाऱ्यांची संख्या इतकी मोठी आहे, की पादचाऱ्यांना पायी चालण्यासाठी आणखी जागा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण कोरियाची राजधानी सेओल येथील वाहनांसाठी असलेला चार पदरी फ्री-वे तोडून त्या ठिकाणी ‘वॉक वे’ बनविण्यात आले आहेत.
america
केवळ पायी चालणेच नाही, तर दक्षिण कोरियन लोकांना हायकिंगही अतिशय प्रिय आहे. दुर्गम डोंगर, जंगलांमधून पायी हायकिंग करणे हा कोरियाचा राष्ट्रीय छंदच म्हणायला हवा. किंबहुना तीन कोरीयनांमधील किमान एक कोरियन दर महिन्याला हायकिंगसाठी हटकून घराबाहेर पडत असतो. लोकप्रिय हायकिंग स्पॉटवर पोहोचण्यासाठी कोरियन लोक गाडी न वापरता मेट्रो ट्रेनचा उपयोग करतात. पायी चालण्याची सवय असलेल्या कोरियन लोकांची आयुर्मर्यादा २०३० सालापर्यंत जगामध्ये सर्वात जास्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत.
america1
या उलट अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशामध्ये मात्र मशीन्सवर अवलंबून राहण्याची सवय वाढीला लागली आहे. अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या कोरियन लोकांना देखील दैनंदिन कामे उरकण्यासाठी घराच्या बाहेर पडायचे असेल तर सर्वप्रथम हाताशी एखादे वाहन लागतेच. चालावे लागू नये यासाठी अमेरिकेमध्ये एस्कलेटर्स पासून स्वयंचलित वॉक वेज पर्यंत सर्व सुविधा ठिकठीकाणी आढळतात. अमेरिकेमध्ये हायकिंग साठी जाण्याचा छंद हौशी मंडळींपुरताच मर्यादित आहे. दररोज किमान तीस मिनिटे चालल्याने कर्करोग, हृदयरोग, टाईप २ डायबेटीस हे आणि इतरही अनेक विकार दूर राहतात हे माहित असूनही या देशातील लोकांनी ही सवय आत्मसात केलेली नाही.

Leave a Comment