राष्ट्रवादीचे पाचही विद्यमान खासदार पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

NCP
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील पाचही विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळणार आहे. उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळेंसह पाचही विद्यमान खासदारांना 2019 ची लोकसभा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विजयसिंह मोहिते पाटील माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. पण या जागेवर माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले होते. पण विजयसिंह मोहिते पाटील अखेरीस यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत आहेत.

पक्षातूनच साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत नाराजीचा सूर होता. उदयनराजे त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात भाजपच्या जवळ जात असल्याचे चित्र होते. उदयनराजेंना यंदा उमेदवारी आघाडी सरकारचे काढलेले धिंडवडे आणि फडणवीसांवर उधळलेली स्तुतिसुमने यासारख्या कारणांमुळे मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता होती. पण आता उदयनराजेंच्या तिकीटावरील साशंकतेचे मळभ दूर झाल्याचे म्हटले जात आहे.

मधुकर कुकडे भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. याच मतदार संघातून 2014 मध्ये प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. येथे भाजपच्या नाना पटोलेंनी विजय मिळवला होता. पण पटोलेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेली जागा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा काबीज केली. त्यानंतर यंदाही कुकडेंना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि कोल्हापूरमधून धनंजय महाडिक निवडणूक लढणार असल्याचे आधीच स्पष्ट झाल्यामुळे राष्ट्रवादीचे पाचही खासदार आपली जागा राखतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment