
बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगणा राणावतच्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्यांच्या भूमिकांना फार महत्त्व नसतानाही हीट झाले आहेत. यात ‘क्वीन’, ‘तनू वेड्स मनू’ आणि आता ‘मणिकर्णिका’ चित्रपटाचाही समावेश असेल. कंगणाने अशातच आता आपल्या आगामी चित्रपटाविषयीदेखील माहिती दिली आहे. ‘तनू वेड्स मनु’चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे तिने म्हटले आहे.
लवकरच होईल ‘तनू वेड्स मनू ३’ची अधिकृत घोषणा
ती मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान घेतलेल्या मुलाखतीत बोलत होती. लवकरच चित्रपटाच्या तिस-या भागाची घोषणा ‘तनू वेड्स मनु’चे दिग्दर्शक आनंद एल राय करणार असल्याचे तिने म्हटले. २०११ साली या चित्रपटाचा पहिला भाग तर २०१५ साली दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.
आनंद एल राय दोन्ही भागांच्या दमदार यशामुळे आता या चित्रपटाचा तिसरा भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर लवकरच काम सुरू होणार असल्याची माहितीही तिने यावेळी दिली. कंगना याशिवाय २५ जानेवारीला ‘मणिकर्णिका’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिने राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली आहे.
