नव्या पिढीसोबत काम करण्याचा अनुभव निराळाच, म्हणतात अमिताभ बच्चन

amitabh
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी, नव्या पिढीसोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव नुकताच त्यांच्या ब्लॉगद्वारे शेअर केला असून, हा अनुभव आपल्यासाठी अगदी अनोखा, निराळा असल्याचे म्हटले आहे. आपल्या आणि इतर कलाकारांच्या वयामध्ये इतकी तफावत असताना त्यांच्याबरोबर जुळवून घेण्याचा अनुभव अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये व्यक्त केला आहे. ‘आपण वयाची ७७ वर्षे पार केली असताना आपल्या समोर काम करणारी इतर मंडळी विशी-तिशीतली असली, तर त्यांच्यासोबत काम करणे, त्यांची मते आणि विचार जाणून घेण्याचा अनुभव काहीसा निराळा, क्वचित दडपण आणणारा ही असतो’ असे अमिताभ त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हणतात. पण त्याचसोबत नव्या पिढीची मते, त्यांचे विचार जाणून घेण्यामध्येही एक आगळी मजा असल्याचे अमिताभ म्हणतात.

नव्या पिढीसोबत संवाद साधताना, किंवा त्यांच्या संगतीमध्ये राहून काही जुन्या आठवणींना उजाळा देताना, आपण नातवंडांना एखादी गोष्ट सांगतो आहोत आणि ते मन लावून ऐकत आहेत, असाच काहीसा आपला अनुभव असल्याचे बच्चन म्हणतात. त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे विचार ते आपल्याशी आवर्जून शेअर करीत असून, ही मंडळी अमिताभ बच्चन यांचे प्रत्येक गोष्टीबाबत मत जाणून घेण्यासही अतिशय उत्सुक असल्याचा अनुभव अमिताभ यांना येत असतो.

सध्या अमिताभ, अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असून, या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘ड्रॅगन’ असे ठेवण्यात आले होते, मात्र नंतर त्यामध्ये बदल करून हे नाव ‘ब्रह्मास्त्र’ करण्यात आले. दीडशे कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित केला जाणार आहे.

Leave a Comment