‘उरी’ची बॉक्स ऑफिसवर शंभरी पार

uri
‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत.दहाव्या दिवशी अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री यामी गौतम यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने कमाईचे शतक पूर्ण केले आहे. याविषयीची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

शंभर कोटींच्या कमाईचा आकडाच ”उरी….’ने फक्त ओलांडला नाही, तर २०१९ या वर्षातील तो पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरत असल्याचे त्यांनी ट्विटर पोस्टमध्ये लिहिले आहे. भारतीय सैन्यदलाने २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात सर्जिकल स्ट्राईक करत शेजारी राष्ट्राकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर दिले होते. याच घटनेवर ‘उरी…’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. दिग्दर्शक आदित्य धर याने कलाकारांची फौज उभी करत साकारलेल्या उरीला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून, एकीकडे रणवीर सिंग आणि रणबीर कपूर या अभिनेत्यांच्या लोकप्रियतेच्या चर्चा होतानाच यामध्ये आता अभिनेता विकी कौशलचाही समावेश झाला आहे.

सैन्यदल अधिकाऱ्याची विकीने साकारलेली भूमिका त्याला प्रसिद्धीझोतात आणत असून, तो चाहत्यांच्या मनावर खऱ्या अर्थाने राज्य करत असल्याचे म्हणायला हरकत नाही. अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या ‘उरी’ या चित्रपटाला ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ची टक्कर होती. पण, ‘उरी’च्याच दिशेला प्रेक्षकांचा कल पाहायला मिळाला, ज्या कारणास्तव या चित्रपटाने कमाईचे शतक ओलांडले.

Leave a Comment