छोटा पेंग्विन डान्सबार सुरु झाल्याने खूश झाला असेल: निलेश राणे

nilesh-rane
मुंबई – महाराष्ट्रातील डान्सबार सुरु करण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला असतानाच पुन्हा एकदा शिवसेनेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी लक्ष्य केले आहे. छोटा पेंग्विन मुंबई नाइट लाइफची मागणी पूर्ण झाल्याने खूश असेल, असे ट्विट त्यांनी केले आहे.

निलेश राणे यांनी गेल्या काही दिवसांपासून वारंवार शिवसेनेला लक्ष्य केले असून आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याने शिवसैनिकांनी काही ठिकाणी त्यांचे पुतळेही जाळले होते. या घडामोडी ताज्या असतानाच आता निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. ट्विटमध्ये त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेतलेले नाही. डान्सबारसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला त्यांनी दिला आहे. डान्सबार संदर्भातील जाचक अटीही सर्वोच्च न्यायालयाने शिथील केल्या आहेत. निलेश राणे या पार्श्वभूमीवर ट्विटमध्ये म्हणतात, छोटा पेंग्विन खूश असेल, त्याच्या मुंबई नाइट लाइफची मागणी त्याने देवाकडे एवढी मनापासून केली की डान्स बार चालू झाले.


आणखी एका ट्विटमध्ये निलेश राणे यांनी बेस्ट संपावरुन शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेवरही टीका केली. संजय राऊत यांचे स्क्रिप्ट लिहायचे काम आहे. स्वतःकडून प्रश्न सुटत नाही आणि दुसऱ्याने सोडवले की सहन होत नाही. ह्या स्वभावाला चिंधीगिरी म्हणतात, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. दुसऱ्याने शशांक राव यांचे स्क्रिप्ट लिहिले होते, असा आरोप अनिल परब यांनी केला होता. यावर निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.

Leave a Comment