मोदींना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला अटक

narendra-modi
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार असल्याची धमकी देणारा फोन आल्याने एकच खळबळ उडाली. एका व्यक्तीने मुख्तार अली असे नाव सांगत दिल्ली पोलीस कंट्रोल रूमला कॉल केला आणि पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी देत त्यांच्या विषयी अपशब्दही वापरले. आनंद पर्वत भागातून पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने दारूच्या नशेत पोलीस कंट्रोल रूमला कॉल करत धमकी दिल्याचे उघड झाले.

दिल्ली पोलिसांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने आयबी, एसपीजी तसेच इतर सुरक्षा यंत्रणांना या विषयी माहिती दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने बुधवारी सकाळी ११च्या सुमारास पोलीस कंट्रोल रूमला कॉल केला आणि त्या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोंदीबद्दल अपशब्द वापरत त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्याने भाजपच्या इतर नेत्यांविषयीही अपशब्द वापरले. सुरक्षा यंत्रणांनी या कॉलची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. तपासानंतर हो कॉल आनंद पर्वत भागातून आला असल्याचे समोर आले. रात्री उशिरा पोलिसांनी शिंपी काम करणाऱ्या मुख्तार अली या आरोपीला ताब्यात घेतले.

या प्रकरणी आयबी, एसपीजी, स्पेशल सेल, क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला. रात्री उशिरापर्यंत आरोपीची चौकशी सुरू होती. त्याने दारूच्या नशेत हा कॉल केल्याचे उघड झाले. आरोपी मुख्तार अलीवर कायदेशीर कारवाई केली जाणार असून पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment