विश्वासदर्शक ठराव थेरेसा मे यांनी जिंकला

theresa-may
लंडन – बुधवारी पार पडलेल्या विश्वासदर्शक ठरावात ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी निसटता विजय मिळवला. ब्रिटनच्या संसदेत गेल्या २४ तासात वेगाने घडामोडी होत आहेत. मंगळवारी संसदेने ब्रेक्सिटचा करार ४३२ – २०२ अशा मताधिक्याने फेटाळल्याने पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा धक्का बसला होता. पण पदावरून पायउतार होण्याची त्यांच्यावरील नामुष्की बुधवारचा विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने काही काळापुरती का होईना टळली आहे.

थेरेसा मे यांनी ब्रिटनच्या इतिहासात गेल्या २६ वर्षात संसदेत पहिल्यांदाच पार पडलेला अविश्वास ठराव ३२५ – ३०६ अशा मताधिक्याने जिंकल्यानंतर नव्या ब्रेक्सिट कराराची बोलणी करण्यासाठी तातडीने विरोधी पक्षाच्या नेत्यांशी बोलणी सुरू केली आहेत. इंग्लड २९ मार्च रोजी युरोपातून वेगळे होणे अपेक्षित आहे. हा करार त्यासाठी सर्वांच्या एकमताने पुढे नेणे आवश्यक असून विरोधकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. ब्रेक्सिटला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर या कराराची तारीख लांबण्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मे यांनी हुजुर पक्ष तसेच त्यांच्या बाजूने मत दिलेल्या मित्रपक्षांचेही आभार मानले. मंगळवारी ब्रेक्सिटविरोधात त्यांच्याच पक्षातील काही सदस्यांनी मतदान केल्याने मे यांना जुना करार मोडीत काढावा लागला. विरोधी मजूर पक्षाचे नेते जेरेमी कोरबीन यांनी बुधवारची चर्चा सुरू करताना पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ब्रेक्सिटचा करार अधिकृतपणे मृत ठरला असून त्या झोंबी सरकार चालवत असल्याची घणाघाती टीका करत त्यांनी मे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

विश्वासदर्शक ठराव जिंकला असला तरी ब्रेक्सिटविरोधी संसदेच्या भूमिकेमुळे मे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने निवडणुकांची मागणी विरोधकांनी लावून धरलेली असताना मे यांनी याचा कडाडून विरोध केला आहे. ब्रेक्सिट पूर्णत्वाला आणण्यासाठी देशात एकमताची गरज असताना अनावश्यक निवडणुकीच्या गोंधळात अस्थिरता निर्माण होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment