रेल्वे मंत्रालय करणार इस्रोच्या गगन जीपीएसचा वापर

railway
नवी दिल्ली – रेल्वेबाबतची विविध अॅपमधून मिळणारी माहिती अनेकदा अद्ययावत नसते. आता ही समस्या कायमची सुटणार आहे. कारण इस्रोचे तंत्रज्ञान असलेल्या गगन या जीपीएसचा रेल्वे मंत्रालय हे वापर करणार असल्यामुळे प्रवाशांना रेल्वेची अचूक माहिती समजू शकणार आहे.

इस्रोच्या तंत्रज्ञानात रिअल टाईम ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टिमचा (आरटीआयएस) वापर रेल्वेच्या प्रवासाची माहिती मिळण्यासाठी केला जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, ८ जानेवारीला याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यावेळी श्री माता वैष्णौदेवी कात्रा-वांद्रा टर्मिनस, नवी दिल्ली-पटणा, नवी दिल्ली-अमृतसर आणि दिल्ली-जम्मू या रेल्वेमार्गावरील रेल्वेच्या वेळेची माहिती घेण्यात आली. याचा फायदा रेल्वेची सेवा कार्यक्षमतेने देण्यासाठी तसेच रेल्वे नेटवर्कसाठी होणार आहे.

आरटीआयएस उपकरणे हे लोकोमोटिव्हमध्ये बसविणार असल्यामुळे गगन या जीपीएसद्वारे रेल्वेची गती ही समजू शकणार आहे. हे उपकरण रेल्वेच्या प्रवासाची वेळ सीआरआयएस डाटा सेंटरमधील केंद्रीय सर्व्हरला पाठविते. त्यासाठी इस्रोच्या एस-बँड मोबाईल सॅटेलाईट सेवेचा (एमएसएस) वापर केला जातो. या माहितीच्या प्रक्रियेवरून रेल्वे नियंत्रण कक्षाला अद्ययावत माहिती मिळू शकणार आहे. तसेच मानवविरहित असलेल्या गेटजवळील अपघात शोधून काढण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

Leave a Comment