
बॉलिवूडचे एकेकाळचे चॉकलेट हिरो अर्थात ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे कायमच सोशल मीडियात चर्चेत असतात. पण सध्या ते आपल्या आजारपणावर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. यादरम्यान त्यांची साथ देण्यासाठी त्यांच्या पत्नी नीतू सिंग या त्यांच्यासोबतच आहेत. ऋषी कपूर यांच्यासारख्याच नीतू या देखील सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यादेखील आपल्या कुटुंबियासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या याच माध्यमातून त्या ऋषी कपूर यांच्या तब्येतीबाबतच्या अपडेट चाहत्यांना देत असतात. सध्या त्यांनी ऋषी कपूरसोबतचा लंच डेटवरील फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोपेक्षा त्यांनी दिलेल्या कॅप्शनची सर्वात जास्त चर्चा रंगली आहे.
नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोपेक्षा कॅप्शनची होत आहे चर्चा
न्युयॉर्कमधील एका हॉटेलमधील एक फोटो नीतू यांनी शेअर केला असून ऋषी कपूर यांच्यासोबत त्या लंच डेटवर गेल्या होत्या. त्यांनी यावेळी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण फोनमध्ये ऋषी कपूर व्यस्त असल्याचे पाहायला मिळाल्यामुळे या प्रसंगाला नीतू यांनी साजेसे कॅप्शन दिले आहे. जर लग्नाच्या ३८ वर्षानंतर तुम्ही नवऱ्यासोबत लंच डेटवर जात असला, तर त्यावेळी असेच काहीसे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. ऋषींसोबत फोटो घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. पण ते मात्र फोनमध्ये हरवले आहेत. त्यांना माझ्याकडे बघायला वेळच नाही, असे कॅप्शन नीतू यांनी या फोटोला दिले आहे.
