छत्तीसगडमधील एक महिला मागील ३० वर्षांपासून केवळ चहावर जगत आहे

Tea
केवळ चहावर एक महिला जगत असल्याचे तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना, पण हे खरे आहे. छत्तीसगडमधील एक महिला एक दोन नव्हे तर तब्बल ३० वर्ष केवळ चहा पिऊन जिवंत असल्याचा दावा तिने केला आहे. वयाच्या ११ व्या वर्षी बराडिया गावातील कोरिया जिल्ह्यात पिल्ली देवी या महिलेने अन्न सोडले. ती तेव्हापासून केवळ चहा पिऊन जगत आहे. तिला तिच्या या जीवनशैलीमुळे गावात चायवाली चाची म्हणून ओळखतात.

याबाबत पिल्ली देवी यांचे वडिल रती राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिल्ली आता ४४ वर्षांची असून तिने सहावीत असताना अन्न सोडले आहे. ती सहावीत असताना शाळेतर्फे जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी जनकपूर येथे गेली होती. तिथून परतल्यापासून तिने अन्न आणि पाणी सोडले. ती सुरुवातीला दुधाचा चहा प्यायची आणि त्यासोबत बिस्कीट आणि ब्रेड खायची असेही त्यांनी सांगितले. पण नंतर ती ब्लॅक टी कडे वळाली. आरोग्याची कोणतीही समस्या तिला उद्भवू नये यासाठी डॉक्टरांकडेही तिला नेण्यात आल्याचे तिच्या भावाने सांगितले. पण तिच्यात डॉक्टरांना कोणतीही समस्या आढळली नाही. तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वचितच ती घराबाहेर पडते. अन्यथा ती दिवसभर घरात शंकराची भक्ती करण्यात मग्न असते. या गावातील एका डॉक्टरने अशाप्रकारे केवळ चहावर एवढी वर्ष जगणे कसे शक्य आहे असे मत व्यक्त केले आहे.

Leave a Comment