नितीन गडकरींविरोधात माजी आमदार आशिष देशमुखांची उमेदवारी

ashish-deshmukh
नागपूर- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नागपुरातून थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातच मागच्या वर्षी भाजपवर टीकेची झोड उठवत काँग्रेसमध्ये गेलेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी उमेदवारी मागितली आहे. उमेदवारीसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया प्रदेश काँग्रेस कमिटीने सुरू केली आहे. इच्छुकांचे अर्ज 18 जानेवारीपर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर करायचे आहेत.

माजी आमदार आशिष देशमुख यांचा नागपुरातून पहिलाच अर्ज आला आहे. देशमुख यांनी गेल्यावर्षी भाजपला रामराम ठोकत आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी त्यानंतर नागपुरात गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची एकतर्फी घोषणा केली होती. पण त्यांनी आता अधिकृतरीत्या पक्षाकडे अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडे नागपूरसाठी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासह अनेक दावेदार आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसचे प्रभारी म्हणून यश मिळवणारे सरचिटणीस माजी खासदार अविनाश पांडे, शहराध्यक्ष विकास ठाकरे, महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते प्रफुल्ल गुडधे, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे अनेक नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. याशिवाय, भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसवासी झालेले माजी खासदार नाना पटोले यांनीही नागपुरातून लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे नागपुरात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी अभूतपूर्व अशी रस्सीखेच बघायला मिळते आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाजपकडून नाव निश्चित असल्यामुळे गडकरी यांच्यासारख्या हेवीवेट नेत्याला लढत देण्यासाठी सारेच इच्छुक आहेत. शेजारच्या रामटेक मतदारसंघासाठीही संभाव्य उमेदवारांचे अर्ज मागवले जाणार असून रामटेकसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक पुन्हा उमेदवारीचे दावेदार असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Comment