राज ठाकरेंवर टीका करण्याच्या नादात ट्रोल झाली भाजप

raj-thakre1
मुंबई : भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या कुंचल्यातून ‘फटकारे’ ओढत असतात. राज यांच्या या व्यंगचित्राला आता भाजपने जशाच तसे उत्तर दिले आहे. एक व्यंगचित्र भाजपने टि्वट केले आहे. पण या टि्वटमुळे भाजपच ट्रोल झाली आहे.

राज ठाकरे यांनी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने नवे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. पंतप्रधान मोदी या व्यंगचित्रात पतंग उडवत आहे आणि अमित शहा बाजूला फिरकी गुंडाळत आहे. हवेत असलेल्या पतंगावर सवर्णांना दिलेल्या 10 टक्के आरक्षण आणि इतर असे सांगत नव्या थापा, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. तसेच या व्यंगचित्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पाठीमागे भक्त उभे असल्याचे दाखवले आहे.

हेच व्यंगचित्र घेऊन आता भाजपने आपल्या ‘भाजप महाराष्ट्र’ या टि्वटर अकाऊंटवरून एक व्यंगचित्र टि्वट केले आहे. राज ठाकरेंना या व्यंगचित्रातून बोलघेवडा अशी टीका करून ‘बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच’, असल्याची टीका केली आहे. या व्यंगचित्रात राज यांच्या बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे.

परंतु, भाजपच या व्यंगचित्रामुळे ट्रोल झाली आहे. राज यांचेच खरे व्यंगचित्र घेऊन त्यात छेडछाड करून हे टि्वट करण्यात आले आहे. राज यांच्या व्यंगचित्रात मोदी आणि शहा यांच्या पाठीमागे ‘भक्त’ उभे असल्याचे दाखवलं आहे. तर भाजपच्या व्यंगचित्रात ‘नमो रुग्ण’ दाखवण्यात आले आहे. ‘नमो रुग्ण’ दाखवल्यामुळे भाजप ट्रोल झाली आहे. टि्वटरवर मनसेसैनिकांनी भाजपच्या आयटी सेलवर सडकून टीका केली आहे.

Leave a Comment