राज ठाकरेंचे मोदींसाठी ‘संक्रांत विशेष’ व्यंगचित्र

RAJ-THAKRE
मुंबई: पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लक्ष्य केले आहे. थापांचे पतंग पंतप्रधान मोदी उडवत असल्याचे राज यांनी व्यंगचित्र रेखाटले आहे. मोदी अमित शहा, भक्त आणि काही मीडियासोबत पतंग उडवत आहेत. आकाशात 10 टक्के सवर्ण आरक्षणाचा पतंग उडत आहे आणि आधी दिलेल्या आश्वासनांचे पतंग गच्चीत पडले असल्याचे व्यंगचित्र काढून आरक्षणाच्या निर्णयावरुन राज यांनी टोला लगावला आहे.

गेल्याच आठवड्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यानंतर लगेचच याबद्दलचे विधेयक संसदेत मंजूर करुन घेण्यात आले. पण हे आरक्षण तांत्रिकदृष्ट्या टिकणार नाही, असा अंदाज अनेक घटनातज्ज्ञांनी व्यक्त केला. मोदींची त्यावरुन नवी थाप असे व्यंगचित्र राज यांनी रेखाटले आहे. मोदी अमित शहा, भक्त आणि काही मीडियासोबत पतंग उडवत आहेत. त्या पतंगावर ‘नव्या थापा 10% आरक्षण’ असा मजकूर आहे. मोदी आणि आसपासचा गोतावळा आनंदाने पतंग उडवत असल्याचे राज यांनी व्यंगचित्रात दाखवले आहे. पण याकडे त्याच गच्चीवर असलेल्या भाजपने पाठ फिरवली आहे.

आकाशात सवर्ण आरक्षणाच्या थापेचा पतंग उडत असताना काही जुने पतंग मात्र गच्चीवर पडून आहेत. त्यातीत प्रत्येक पतंगावर मोदींची आश्वासने, त्यांचे निर्णय आणि योजनांचा उल्लेख आहे. राज यांनी त्यांच्या व्यंगचित्रात मेक इन इंडिया, नोटाबंदी, स्वच्छ भारत, जीएसटी, देशी काळा पैसा, डिझेल-पेट्रोलचे दर, कर्जमाफी, प्रतिवर्षी 2 कोटी रोजगार, परदेशी काळा पैसा, नीरव मोदी, मल्ल्या, चोक्सी आणि इतर असा मजकूर असलेले पतंग गच्चीवर पडल्याचे चित्र दाखवले आहे. मोदी केवळ थापांचे पतंग उडवतात. प्रत्येकवेळी नव्या थापा मारतात, असे राज यांनी व्यंगचित्रातून सुचवले आहे.

Leave a Comment