‘एबीसीडी-३’मध्ये आता शक्ती मोहनचीही एन्ट्री

shakti-mohan
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला रेमो डिसुझा दिग्दर्शित ‘एबीसीडी-३’ हा चित्रपट येणार आहे. श्रद्धा कपूर आणि वरूण धवन हे पुन्हा एकदा या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटात श्रद्धानंतर अभिनेत्री नोरा फतेही हीची देखील वर्णी लागली आहे. यात ती देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. आता या दोघीनंतर यात डान्सिंग क्विन शक्ती मोहनचीही एन्ट्री होणार आहे. शक्तीचा हा पहिलाच बॉलिवूड डेब्यू असणार आहे.

नेहमीच शक्ती मोहनच्या डान्सची भूरळ तिच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. डान्सरसोबतच शक्तीने कोरिओग्राफरचेही काम केले आहे. ती छोट्या पडद्यावरील ‘डान्स प्लस’ या शोच्या परिक्षकाच्या भूमिकेतही दिसली. ती आता ‘एबीसीडी-३’ या चित्रपटातही झळकणार असल्यामुळे शक्तीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची पर्वणी असणार आहे.


डान्सवर आधारित ‘एबीसीडी’ चित्रपटाची सिरीज होती. आता हा तिसरा भाग देखील डान्सवरच आधारित असणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला २२ जानेवारीपासून पंजाबमध्ये सुरुवात होणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करणार आहेत. २०१५ मध्ये आलेल्या ‘एबीसीडी २’ चित्रपटाचे दिग्दर्शन देखील रेमो डिसुझाने केले होते. ६५ कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार यश मिळवले होते. आता या आगामी चित्रपटालादेखील प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment