सोनू निगमच्या हत्येचा कट बाळासाहेब ठाकरेंनी रचला होता – निलेश राणे

nilesh-rane
मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी सनसनाटी आरोप करत खळबळ माजवून दिली आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यूसाठी बाळासाहेबांना निलेश राणे यांनी जबाबदार ठरवले आहे. तर बाळासाहेबांनी दुसरीकडे गायक सोनू निगमच्या हत्येचा कट रचला होता असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

बाळासाहेबांना सोनू निगमलाही ठार मारायचे होते. अनेकदा तसे प्रयत्न देखील झाले. हवे तर तुम्ही त्यांनाच याबाबत विचारा आज बाळासाहेब नाहीत तर ते खरे सांगतीलही. मला सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचे नात काय? हे सांगायला लावू नका, अन्यथा मी हे सर्व जाहीर सभेत सांगेन, अशी धमकीच निलेश राणे यांनी दिली आहे.

कोणा कोणाचे मृत्यू बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्महाऊसवर झाले हे सर्व सांगेन. आमच्या नादी लागायचे नाही, आम्हाला राणे म्हणतात, अशा शब्दांत निलेश राणे यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. त्यांनी हे आरोप एका मुलाखतीत केले आहेत. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. पण त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन भासवण्यात आल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे. तसेच दोन शिवसैनिकांना हा प्रकार सहन न झाल्याने त्यांना संपवण्याचे आदेशही बाळासाहेबांनी दिल्याचा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.

आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू रुग्णालयात झाल्याचे भासवण्यात आले. दोन शिवसैनिकांना हे सहन न झाल्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी कोणाला बाळासाहेब ठाकरेंनी आदेश दिले. ही केस कशी दाबली गेली? असे सवाल करीत निलेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

निलेश राणे यांनी सांगितले की, आजपर्यंत शिवसेनेविरोधात बोलताना नारायण राणे आणि आम्ही एक मर्यादा पाळली. आम्ही कधीही बाळासाहेब ठाकरेंवर आरोप केले नाहीत. आजही बाळासाहेबांवर आमच्या राणेसाहेबांचे प्रेम होते पण ते व्यक्त करु शकले नाहीत. मी राणे साहेब म्हणत असलो तरी ते आधी माझे वडिल आहेत. जर जाहीर कार्यक्रमात त्यांचा कोणी अपमान करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. मला बाळासाहेबांची खरी परिस्थिती सांगावीच लागेल. राणेसाहेब माझ्यासाठी महत्वाचे बाळासाहेब नव्हे. आजवर आम्ही मर्यादा पाळली मात्र विनायक राऊतांनी व्यासपीठावर ती पाळली नाही.

Leave a Comment